Ad will apear here
Next
पर्यावरणाचा, नव्हे मानवजातीचा ऱ्हास


सध्याची वाढलेली मानवी लोकसंख्या, अन्न आणि ऊर्जेची वाढती मागणी, बदलतं हवामान, ही मानवी वंशऱ्हासाची सुरुवात तर नाही ना? याचं कारण जेव्हा एखाद्या प्राणिजातीची संख्या वाजवीपेक्षा जास्त वाढते तेव्हा जगण्याची स्पर्धा तीव्र होते. त्या प्राणिजातीत आक्रमकता वाढते. आपापसात मारामाऱ्या सुरू होतात. आपल्यापुढे तशाही अन्न, पाणी आणि ऊर्जा यांच्या कमतरतेच्या समस्या आहेत. त्याचबरोबर ज्यांना या समस्या भेडसावताहेत त्यांच्याकडे अण्वस्त्रं आहेत. बदललेल्या हवामानामुळे ओले आणि सुके दुष्काळ वाढले, तर या समस्या आणखी तीव्र होतील आणि ती कदाचित मानव जातीच्या अस्तित्वाच्या कृष्णपक्षाची सुरुवात ठरेल.

आजच्या पर्यावरणदिनानिमित्त ज्येष्ठ विज्ञानलेखक निरंजन घाटे यांनी लिहिलेला हा लेख... 
.......
पाच जून हा पर्यावरण दिन म्हणून दर वर्षी साजरा केला जातो. त्या निमित्ताने प्रदर्शनं भरतात. प्रभातफेऱ्या काढल्या जातात. निबंध स्पर्धा होतात. भाषणं तर उदंड होतात. खरं तर पर्यावरणविषयक अनेक नियम सर्वच देशांत वर्षानुवर्षे अस्तित्वात होते. वेगवेगळ्या संस्कृतींमध्येही पर्यावरणविषयक नियम होते; पण त्यांना धार्मिक स्वरूप असे. अमेरिकेतील आदिवासी - ज्यांना (रेड) इंडियन म्हटलं जातं, त्या जमाती त्यांचं एक बोधचिन्ह निवडत असत. त्यांच्या धर्मस्तंभावर हे बोधचिन्ह असे. या धर्मस्तंभाला ‘टोटेम पोल’ असं म्हटलं जात असे. जेव्हा दोन-अनोळखी ‘इंडियन’ एकमेकांना भेटत तेव्हा ते ‘तू कोणत्या प्राणिकुळाचा’ असं विचारत असत. गरूड, अस्वल, गवा, रोडरनर असं याचं उत्तर दिलं जायचं. ‘गरूड’ धर्मस्तंभ असलेली जमात चुकूनही गरुडाला अपाय करत नसे. यामुळे या जमातीच्या भूप्रदेशात ‘गरूड’ सुखेनैव संचार करीत. अशीच काहीशी प्रथा ईशान्य भारतात आणि म्यानमारमधील आदिवासींमध्ये होती.

वेद हे तर निसर्गपूजेचं भांडारच आहेत. त्या काळापासून भारतात विविध वृक्ष आणि पशुपक्षी यांना मध्यवर्ती मानून अनेक सणवार साजरे केले जात. वड, पिंपळ आणि उंबरासारखं पशु-पक्ष्यांचं आश्रयस्थान आणि पांथस्थांना सावली देणारे वृक्ष तोडण्यास धर्मानेच मनाई केली होती. कौटिलीय अर्थशास्त्रात राजाने वनं निर्माण करून त्यात विविध प्राणी पाळावेत, विशिष्ट प्रसंगी वन्य पशूंची हत्या करायची वेळ येईल, तेव्हा फक्त नरांची हत्या करावी, माद्यांना - त्यातही गर्भवती माद्यांना कधीही मारू नये, असं म्हटलं आहे. अनेक भारतीय राजांनी जिथे रस्ते बांधले तिथे रस्त्याच्या कडेने दुतर्फा झाडं लावली, असे उल्लेख त्यांच्या काळातील शिलालेखांत आणि आज्ञापत्रांत लिहिलेले आढळतात. कोणती झाडं तोडावीत, कोणती तोडू नयेत, तोडलेल्या झाडांच्या जागी परत नवी झाडं लावावीत, हे शिवाजी महाराजांनी आग्रहानं नमूद केलेलं आहे.

पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत अनेक राजेरजवाड्यांची खासगी वनं होती. त्यातले प्राणी मारण्याची सामान्यजनांना बंदी असे. राजे कधी तरी सटी-सहामाशी शिकारीला जात. त्यातही शौर्यप्रदर्शन अधिक असे. भारतात अनेक राजांबाबत भाल्याने किंवा तलवारीने समोरासमोर लढून वाघ मारला, अशा (दंत) कथा ऐकवल्या जातात. राजाला जास्तीत जास्त संरक्षण म्हणजे तो हत्तीवर असे.

पुढे ब्रिटिश साम्राज्य जगभर पसरल्यावर, किंबहुना इतरही पाश्चात्य देशांनी वेगवेगळ्या भूखंडात वसाहती स्थापन केल्यानंतर अनेक प्राणिजाती नष्ट झाल्या. स्पेन आणि पोर्तुगाल या देशांनी अमेरिकन इंडियन जमाती नष्ट केल्या आणि त्याच अमेरिकेच्या उत्तर भागातले गवे, लांडगे आणि पॅसेंजर पीजनचे थवे इतर युरोपीय वसाहतवाल्यांनी नष्ट केले.

बफेलो बिल ही उपाधी ज्याला मिळाली त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनीच नव्हे, तर इतर गोऱ्यांनीही अमेरिकेच्या गवताळ प्रदेशातील या राजबिंड्या प्राण्यांची प्रचंड मोठ्या संख्येने हत्या केली. शंभर वर्षांत लाखोंच्या घरात गवे मारण्याचा विक्रम नोंदवण्यात आला, असं इतिहास सांगतो. सतराव्या आणि अठराव्या शतकापर्यंत पॅसेंजर पीजनचे थवे जेव्हा आकाशगामी बनत तेव्हा सूर्यग्रहण लागल्याचा भास व्हायचा. एकेका थव्यात काही लाखांहून अधिकही रानकबुतरं असत. आज ती नामशेष झाली आहेत. जिथे जिथे पाश्चिमात्य लोक वसाहती करून स्थिरावले तिथले तिथले अनेक प्राणी नाहीसे झाले. याचं कारण युरोपीय लोक प्राणी मारणं ही करमणूक समजत. पुढे ते जिथं राज्यकर्ते बनले तिथल्या स्थानिकांनी या नव्या मालकांना खूष करण्यासाठी हे हत्यासत्र आणखी जोरात चालवलं.

पाश्चिमात्यांचं पर्यावरण प्रेम हे बेगडी आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. पाश्चिमात्यांच्या दृष्टीनं सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आर्थिक फायदा! जर पर्यावरणावर प्रेम दाखवून फायदा होणार असेल तरच त्यांचं पर्यावरण प्रेम उफाळून येतं. जर आर्थिक तोटा होणार असेल, तर त्यांना पर्यावरणाशी काही देणं-घेणं नसतं, हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे.

राचेल कार्सनचं ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं आणि खऱ्या अर्थाने अमेरिकेत पर्यावरण चळवळीने जोर धरला. त्यानंतर अमेरिकी उद्योगांनी राचेल कार्सनला साम्यवादी ठरवण्यापासून तिचं मानसिक संतुलन बिघडलंय, इथपर्यंत अनेक प्रकारे राचेलला अविश्वसनीय ठरवण्याचे प्रयत्न केले होते. त्यानंतर आठ-१० वर्षांच्या आतच व्हिएतनाममध्ये निष्पर्णीकरणासाठी ‘एजंट ऑरेंज’ नावाचं रसायन फवारण्यात आलं. अमेरिकेत जेव्हा याबद्दल खूपच ओरड झाली, तेव्हा खूप उशीर झाला होता. कारण तोपर्यंत अमेरिकी सैन्यानं व्हिएतनाममधून माघार घ्यायला सुरुवात केली होती. यानंतर मात्र कार्टर यांच्या काळात अमेरिकेला पर्यावरणाची जाणीव होऊ लागली. त्यातच १९८४च्या सुमारास ओझोन विवर निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यातून सीएफसी (क्लोरो फ्लुरो कार्बन्स) या रसायनांचा प्रश्न ऐरणीवर आला. पुढे त्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली. ‘सीएफसी’ची सर्वाधिक निर्मिती आणि वापर अमेरिकेत होत होता. ही सीएफसी बंदी तिसऱ्या जगातील विकसनशील देशांवरही लादण्यात येत होती; पण विकसनशील देशांमध्ये आणि अमेरिकेत एक फार मोठा फरक आहे, हे अमेरिका कधीच लक्षात घेत नाही. जेव्हा (अजूनही मोठ्या प्रमाणात) भारतीय नागरिक एखादी वस्तू विकत घेतो, तेव्हा पुढची पिढीसुद्धा ती वापरू शकेल याचा तो विचार करतो. अमेरिकी नागरिक दर वर्ष-दोन वर्षांनी घरातल्या वस्तू बदलतो. तिथं दुरुस्तीची दुकानं नसतात. बिघाड झाला की ती वस्तू फेकून द्यायची आणि तशीच, पण अधिक सुधारित नवी वस्तू परत विकत घ्यायची.

या प्रकारामुळे खरं तर प्रदूषण भरपूर वाढतं. पर्यावरणाची अधिक प्रमाणात हानी होते. तिकडे दुर्लक्ष करून, भारतातील गायी गवत खाऊन जो मिथेन वायू ढेकरा देत सोडतात किंवा शेण टाकताना जो मिथेन वायू शेणाबरोबर बाहेर पडतो त्यामुळे जागतिक तापमानवाढीस हातभार लागतो, अशा तऱ्हेचं संशोधन केलं जातं आणि त्याला प्रसिद्धी दिली जाते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बुश (ज्युनियर) यांनी जाताजाता भारत आणि आशियातील माणसांच्या खाण्याचा जागतिक तापमानवाढीशी संबंध जोडला होता. त्या वेळी, अमेरिकेतला माणूस रोज जेवढं अन्न वाया घालवतो तेवढ्या अन्नात भारताच्या लोकसंख्येएवढी आशियाई गरीब माणसं आठवडाभर जेवू शकतील, असं अमेरिकन वृत्तपत्रांनीच छापलं होतं.

अलीकडे भारतीय (आणि इतर आशियाई) खेड्यांतून जे सरपण आणि गोवऱ्या जाळल्या जातात, त्यांच्या धुरामुळे जागतिक तापमानवाढ होत असल्याची हाकाटी अमेरिकी वृत्तपत्रांनी सुरू केली आहे. साधारणपणे भारतावर एखाद्या बाबतीत दडपण आणायचं असलं, की ज्या बाबींबाबत भारताशी मतभेद असेल ती बाब सोडून तिसराच एखादा प्रश्न ऐरणीवर घ्यायचा आणि नंतर भारताशी वाटाघाटी करताना त्या मुद्द्याला सैल सोडून हवं ते पदरात पाडून घ्यायचं, ही पद्धत अमेरिका गेली कित्येक वर्षं विकसनशील देशांविरुद्ध वापरत आली आहे.

भारतात जैवतंत्रज्ञानाने निर्मिती केलेल्या कापसाला आणि इतर भाज्यांना जबरदस्त विरोधाला तोंड द्यावं लागत आहे. युरोपात तर अमेरिकेतील बऱ्याच खाद्यपदार्थांना बंदी आहे. याचं कारण जैव तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या प्राणी आणि वनस्पती यांपासून माणसाला आणि पर्यावरणाला धोका नाही, हे सिद्ध झालेलं नाही. जैवतंत्रज्ञानाच्या साह्यानं उत्पादन करणाऱ्या कंपन्या ‘आम्ही सर्व प्रकारची काळजी घेतली आहे’ असं जाहीर करतात. त्रयस्थ आणि निष्पक्षपणे चाचण्या करण्यास मात्र त्यांचा विरोध असतो. यासाठी त्या कंपन्या त्यांच्या प्रयोगातील व्यापारी गुपित प्रकट होण्याचं कारण देतात. हे अर्थातच संशयास्पद आहे. अनेक औषध कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत त्यांच्या खासगी चाचण्यांत अयशस्वी ठरलेली औषधं बाजारात आणली; पण दुष्परिणाम दिसू लागताच ती मागे घेतली. अशी बरीच उदाहरणं आहेत. त्या पार्श्वभूमीवर या औषध कंपन्यांशी संबंधित जैवतंत्रज्ञान कंपन्यांचे दावे जगाला मान्य होण्यासारखे नाहीत, हे उघड आहे.

हैदराबादस्थित एका संस्थेनं बाजारात आणलेल्या जैव तंत्रज्ञानानं निर्माण केलेल्या वांग्यांचा वाद गाजतोच आहे. सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे प्रगत पाश्चिमात्य देशातल्या उद्योगधंद्यांनी आणि वाहनांनी केलेल्या प्रदूषणात कोणतीही कपात करायची नाही, जागतिकीकरणाच्या नावाखाली विकसनशील देशांतील नागरिकांना नको ती वाहनं घ्यायला उद्युक्त करायचं आणि या उद्योगावर पांघरूण घालण्यासाठी मग गायींच्या रवंथ करण्यामुळे त्यांच्या ढेकरा आणि अपानवायूतून बाहेर पडणारा मिथेन, तिसऱ्या जगातील चुलींमधून बाहेर पडणारा धूर यामुळे जागतिक तापमानवाढ होत असल्याचे शोध आणि आकडेवारी जाहीर करायची. याबद्दल तिसऱ्या जगातील शास्त्रज्ञांनी खरं तर आवाज उठवण्याची गरज आहे.

वाढती लोकसंख्या हा एक कळीचा मुद्दा आहे. या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्याची खरोखरच गरज आहे; मात्र तशी इच्छाशक्ती बऱ्याच देशात दिसत नाही. भारतात तर यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. इ. स. २०२५च्या सुमारास चीनची लोकसंख्या मर्यादा ओलांडेल, असं म्हटलं जातं. या मोठ्या लोकसंख्येला अन्न आणि ऊर्जा पुरवणं म्हणजे प्रदूषणात वाढ करणं, जंगलतोड करून शेती करणं, आदी सर्व पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या गोष्टींना पर्याय नाही.

यामुळे एक थोडा वादग्रस्त विचार मनात येतो. तो म्हणजे हे सर्व पर्यावरण- रक्षणाचे प्रयत्न खरंच पुरे पडणार आहेत का? जर ते पुरे पडणार नसतील, तर कशासाठी करायचे? आपल्या देशात आपण अनेक दिवस साजरे करतो. त्यातलाच हा एक दिवस. अनेक जण भाषणं देतील. बऱ्याच स्पर्धा होतील आणि त्याच दिवशी पर्यावरणाचं नुकसान करणाऱ्या अनेक घटनाही घडतील. हे सगळं का घडतं?

उत्क्रांती आणि पर्यावरण यासंबंधीचं संशोधन गेली ४० वर्षे वाचल्यानंतर आणि भूशास्त्राचं अध्ययन आणि काही काळ अध्यापन केल्यानंतर काही गोष्टी आपल्या लक्षात आल्या असं वाटू लागतं. ते तसं असेलच असं नाही. एक तर भूशास्त्राचा अभ्यास करताना पृथ्वीवरच्या प्राचीन वातावरणाची माहिती करून घ्यावी लागली. पृथ्वीच्या कोणत्याही भूभागातली नैसर्गिक परिस्थिती स्थिर नसते, तर ती सातत्याने बदलत असते. आज जिथं वाळवंटं आहेत, तिथं एके काळी सुपीक जमीन होती. जिथं पर्वत आहेत तिथं सागर होते. माणूस पृथ्वीवर वावरायला लागल्यानंतर अनेक हिमयुगं आणि या हिमयुगांच्या दरम्यान खूप वाढलेलं तापमान मानवाने बघितलेलं आहे. या हिमयुगात आणि उष्ण काळात अनेक प्राणिजाती नष्ट झालेल्या मानवानं बघितल्या आहेत. तेव्हा, बदलतं हवामान, वाढतं तापमान या घटना आजच्या नाहीत आणि पूर्वीच्या घटनांना मानव निश्चितच जबाबदार नव्हता.

सर्वसाधारणपणे निसर्गचक्रात एखादी प्राणिजात जेव्हा निसर्गाशी जुळवून घेते, तेव्हा ती नैसर्गिक संकटांमधून वाचते आणि टिकून राहते. हे जेव्हा त्या जातीच्या प्रजेची संख्या मर्यादित असते तेव्हाच शक्य होतं. जेव्हा एखाद्या भूभागात प्राण्यांच्या संख्येत वाढ होते तेव्हा ते आपापसात झगडू लागतात, आक्रमक बनतात आणि ही त्या प्राणिजातीच्या नाशाची सुरुवात असते. याची बरीच उदाहरणं पृथ्वीच्या गेल्या ६५ कोटी वर्षांच्या इतिहासात आढळतात. ही सर्वंकष संहाराची उदाहरणं जशी आहेत, तशी मर्यादित संहाराची उदाहरणंही आहेत. महाकाय हत्ती आणि अनेक महाकाय सस्तन प्राणी सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी नष्ट झाले. हा संहार एका दिवसात घडत नाही. किमान काही लाख ते कोटी वर्षांची ही प्रक्रिया असते.

सध्याची वाढलेली मानवी लोकसंख्या, अन्न आणि ऊर्जेची वाढती मागणी, बदलतं हवामान, ही मानवी वंशऱ्हासाची सुरुवात तर नाही ना? याचं कारण जेव्हा एखाद्या प्राणिजातीची संख्या वाजवीपेक्षा जास्त वाढते तेव्हा जगण्याची स्पर्धा तीव्र होते. त्या प्राणिजातीत आक्रमकता वाढते. आपापसात मारामाऱ्या सुरू होतात. आपल्यापुढे तशाही अन्न, पाणी आणि ऊर्जा यांच्या कमतरतेच्या समस्या आहेत. त्याचबरोबर ज्यांना या समस्या भेडसावताहेत त्यांच्याकडे अण्वस्त्रं आहेत. बदललेल्या हवामानामुळे ओले आणि सुके दुष्काळ वाढले, तर या समस्या आणखी तीव्र होतील आणि ती कदाचित मानव जातीच्या अस्तित्वाच्या कृष्णपक्षाची सुरुवात ठरेल.
- निरंजन घाटे 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZDBCN
Similar Posts
निसर्गाला आहे तसा ठेवण्याची ‘अभय’शपथ घ्यायलाच हवी! अधिक मासातल्या दानामागे वैज्ञानिक सूत्र, सामाजिक आशय आणि नैतिकता गुंफलेली आहे. दानामुळे संबंधित वस्तूवरील आपला हक्क समाप्त होऊन दुसऱ्याचा स्थापित होतो. घेणाऱ्यावर कोणत्याही प्रकारचे उपकार न राहता केलेलं दान सात्त्विक समजतात. याकारणे श्रद्धा, तुष्टि, भक्ती, ज्ञान, अलोभ, क्षमा आणि सत्य या सात गुणांची रुजवात आपल्या व्यक्तिमत्त्वात होत राहाते
वृक्षसंमेलनाध्यक्ष असलेल्या वडाच्या झाडाचं डोळ्यांत अंजन घालणारं भाषण विविध भाषांची ग्रामीण, अखिल भारतीय, जागतिक साहित्य संमेलने होतात. पर्यावरण, पाणी यासह विविध विषयांवर जागतिक संमेलनेही होतात. या संमेलनात संबंधित विषयांवर चर्चा, परिसंवाद होतात; पण बीड जिल्ह्यातल्या पालवण गावाच्या परिसरातील सह्याद्री-देवराई प्रकल्पाच्या डोंगरावर जगातले पहिले-अनोखे वृक्षसंमेलन झाले. या
भारतीय शेतीमालाच्या निर्यातवाढीला चीनमध्ये मोठी संधी ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या लेखमालेच्या आजच्या भागात पाहू या भारतीय शेतीमालाच्या, तसेच अन्य क्षेत्रांतील मालाच्या चीनमध्ये असलेल्या निर्यातसंधींबद्दल...
विसर्जन की विघटन??? अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन मोठ्या धुमधडाक्यात पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी हमखास दिसणारे दृश्य म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेले गणेश मूर्तींचे भग्नावशेष आणि निर्माल्य... ही स्थिती दर वर्षी असते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language